
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते.
गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्यांसाठी भक्तीयोग.
आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो.
सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो.
भक्तियोग हा शरणागतीचा मार्ग आहे. कॊणतीही लाट ही जशी समुद्राचाच भाग असते तसेच आपण परमात्म्याचेच अभिन्न अंग आहोत ही भावना भक्तियोगाचे अनुसरण करणार्यांमध्ये असते.
सुरुवातीला, या तिन्ही मार्गांसाठी वापरली जाणारी भाषा आणि त्यांचे आकलन हे भिन्न भासू शकते. मनावर विसंबून असलेल्या माणसाला जर जाणीवजागृतीचा मार्ग सांगितला तर या जागृतीसाठी कोणती कृती करायची याचा तो शोध घेत राहील.
अर्थात, प्रत्येकाला नेमका कसा अनुभव येतो याची काही अगदी काटेकोर समीकरणे नाहीत. उदाहरणार्थ, जेव्हा कर्म आणि सांख्य हे दोन मार्ग एकत्र येतात तेव्हा आपल्याला जाणीव होईल की सर्व कर्मांचे अंतिम गंतव्य हे एक मृगजळ आहे आणि आपण एखाद्या नाटकातील अभिनयाप्रमाणेच कर्म करताना त्यामध्ये गुंतून पडणार नाही.
जसे संपूर्ण विश्व हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन या कणांनी बनले आहे, त्याचप्रमाणे, आध्यात्मिक जगही या कर्म, सांख्य आणि भक्ती या तीन मार्गांनी साकारले आहे.
श्रीकृष्ण म्हणतात, या सर्व मार्गांमध्ये अहंकारमुक्त आत्मसाक्षात्काराची क्षमता आहे.