Gita Acharan |Marathi

संपूर्ण गीतेत आढळणारा समान धागा कोणता असेल तर तो समत्वाचा धागा आहे. विविध ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी समत्व भाव, समत्व दृष्टी आणि समत्व बुद्धी हे तीन घटक अधोरेखित केले आहेत. समत्व हे समजून घेण्यास सोपे आहे मात्र अंगिकारण्यास तितकेच कठीण. समत्वाचा भाव आपण किती प्रमाणात अंगिकारू शकलो हे आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरील प्रगतीचे निदर्शक आहे. 

भौतिक जगात, कायद्यासमोर सर्व नागरिक समान म्हणजेच समत्व हे बहुतांश समाजाने स्वीकारले आहे. श्रीकृष्ण आपल्याला समत्वाची अनेक उदाहरणे देतात. शहाणा माणूस हा शिकारी आणि शिकार, सुख आणि दु:ख आणि नफा व तोटा या सगळ्यांकडे समबुद्धीने बघतो. 

माणसाची अडचण अशी आहे की तो सतत कोणते ना कोणते कृत्रिम भेद निर्माण करीत असतो. संस्कृती, धर्म, जात, राष्ट्रीयत्व, वंश आणि अशा अनेक आधारांवर हे भेद निर्माण केले जातात. 

या भेदांना पार करणे आणि दोन भिन्न व्यक्तींशी सारखाच व्यवहार ठेवणे ही समत्वाची पहिली पायरी आहे. केवळ बाह्य वर्तनापेक्ष वेगळा आणि अधिक खोलवर असा हा विचार आहे. 

आपल्या जवळच्याही दोन व्यक्तींशी समभावाने वागणे ही समत्वाची दुसरी पायरी आहे. 

आपल्या मुलांची कामगिरी चांगली झाली नसतानाही आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या कामगिरीसाठी आनंदी होणे, सासू आणि सून यांना समभावाने वागविणे, मुलगी आणि सून यांना समभावाने वागविणे ही समत्वाची काही उदाहरणे आहेत. 

समत्वाची सर्वोच्च पातळी म्हणजे इतरांना आपल्यासारखेच समजणे, तो भाव अंगिकारणे. एखाद्या यशावर आपला हक्क आहे असे आपल्याला वाटत असताना जर ते दुसर्‍याला मिळाले तरीही समत्वभाव राखण्याची क्षमता म्हणजे ही पातळी आहे. पदोन्नती, प्रसिद्धी, श्रेय, संपत्ती अशा कोणत्याही बाबतीत हा भाव राखता आला पाहिजे. इतरांचे दोष आपल्यात आणि आपली सामर्थ्यस्थळे आपण इतरांमध्ये बघू लागतो तेव्हा हे शक्य होते. 

स्वत:ला इतरांमध्ये आणि इतरांना आपल्यामध्ये आणि अखेर प्रत्येकामध्ये आणि सगळीकडे कृष्णालाच बघणे असा उपदेश श्रीकृष्ण आपल्याला करतो. हे दुसरे-तिसरे काही नसून अद्वैत आहे, म्हणजे दोन गोष्टी नाहीतच, सगळे एकच. 

समत्वाची ही सर्वोच्च पातळी गाठण्यात अडथळा म्हणजे आपले मन, ज्याला विभाजित करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. मनावर आपल्यावर ताबा घेऊ देण्याऐवजी आपण त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असले पाहिजे. 

 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!