संपूर्ण गीतेचे वर्णन करू शकेल असा एक शब्द जर कुठला असेल तर तो आहे द्रष्टा म्हणजे साक्षीदार आणि हा शब्द अनेक संदर्भात येतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की ‘आपण’ सर्वकाही करतो आणि परिस्थिती नियंत्रित करतो.
कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगी अर्जुन सुमारे 60 वर्षांचा होता, त्याने उत्तम आयुष्य जगले होते आणि सर्व सुखांचा अनुभवही घेऊन झाला होता. योद्धा म्हणून त्याने कित्येक युद्धांमध्ये विजय मिळविला होता. युद्धाच्या प्रसंगी त्याला असे वाटत होते की तो कर्ता आहे (अहम-कर्ता; अहंकार) आणि आपल्या नातलगांच्या मृत्युसाठी तो जबाबदार राहील. त्यामुळे, ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या मनात नैराश्य दाटून आले होते. संपूर्ण गीते दरम्यान भगवान श्रीकृष्ण त्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की तो कर्ता नाही. त्यातून स्वाभाविकपणे एक प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे: “जर मी कर्ता नाही, तर मी काय आहे”. गीतेमध्ये भगवंत सांगतात की अर्जुन हा केवळ एक द्रष्टा आहे, साक्षीदार आहे.
साठ वर्षांच्या आयुष्यात बरे-वाईट अनुभव घेतलेल्या अर्जुनाला हे पचवणे अत्यंत जड जाते की तो केवळ एक साक्षी आहे, कर्ता नव्हे.
भगवंताने अत्यंत कष्टपूर्वक आणि वारंवार हे पटवून दिल्यानंतर अर्जुनाला हे सत्य स्वीकारणे शक्य होते. बहुतांश संस्कृती आपल्याला हेच सांगत असतात की आपण केवळ द्रष्टा आहोत. मात्र, आध्यात्मिक प्रवासाच्या प्रारंभीच्या टप्प्यात असलेल्यांचा या संकल्पनेने गोंधळ उडत असतो.
द्रष्टा ही बुद्धीची आंतरिक अवस्था आहे. भौतिक जगात याची जाणीव होणे कठीण आहे. हीच क्षमता आपल्या सभोवतालच्या दैनंदिन घडामोडींचा प्रभाव न पडता आपल्याला आंतरिक स्थिर राहण्यास मदत करते. जरी भौतिक जगात आपल्याला सुख आणि दु:ख या द्वैतातून जावे लागत असले तरी ही आंतरिक बुद्धी आपल्याला कोणत्याही कर्मफलाची इच्छा न ठेवता आपली कृती करण्यास मदत करते. आपल्या भावनांना साक्षी राहण्याची आणि त्यांना अधीनस्थ करण्याची ही क्षमता आहे.