Gita Acharan |Marathi

आपल्या संवेदना या आपण आणि जग यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतात. गीतेचा या संवेदनांवर परिणाम होतो. न्युरोसायन्स सांगते, “हे न्युरॉन्स एकत्र उत्तेजित होतात ते एकत्र बांधलेलेही असतात”. गीतेतील शब्दही त्या त्या काळातील भाषेचे रुप धारण करून कायमच सारखाच संदेश देत असतात. 

आपल्या मेंदूत सुमारे 10 हजार कोटी इतके न्युरॉन्स असतात. त्यातील काही डीएनएने बांधले असतात जेणेकरून शरीराच्या स्वाभाविकपणे होणार्‍य हालचाली योग्य पद्धतीने व्हाव्यात तर काहींची गुंफण आपण आपल्या आयुष्यात करीत जातो. वाहन चालवायला शिकताना पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना अडचण जाणवते आणि मग हळुहळू आपल्याला त्याचा सराव होतो. वाहन चालविण्यासाठी कराव्या लागणार्‍या सर्व कृतींचा समन्वय साधण्यासाठी वापरात न आलेल्या न्युरॉन्सच्या साहाय्य्याने मेंदू अंतर्गत ‘हार्ड वायरिंग’ करत जातो आणि त्यातून हे शक्य होते. 

इतरही कौशल्यांबाबत असेच असते. मग ते साधे चालणे असो की खेळणे असो की शल्यचिकित्सकाने केलेल्या किचकट शस्त्रक्रिया असोत. ‘हार्ड वायरिंग’ मुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते आणि आपले जगणे सोपे होते. 

नवजात बालक हे वैश्विक बालक असते आणि अनेक गोष्टी करण्याची त्याची क्षमता असते. कुटुंब, मित्र आणि समाजाच्या प्रभावाखाली ती व्यक्ती विविध गोष्टी आत्मसात करत जाते आणि त्यातून अनेक नवीन न्युरल रचना तयार होतात. या रचनांमुळे आपल्याला बाह्य जगाकडून ठराविक प्रकारचे अनुभव आणि संवेदना अनुभवण्याची इच्छा होते आणि ते मिळवण्यासाठी आपण कठोर कष्ट करतो. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांना स्वत:ची केलेली स्तुती आवडत असते कारण आपल्या न्युरल रचनांना त्याची अपेक्षा असते आणि ते आवडतही असते. या रचनाच आपल्या अपेक्षा, पूर्वग्रह आणि निष्कर्षांना कारणीभूत असतात. 

या रचनांचे मिश्रण आणि आपले प्रयत्न यातूनच आपला अहंकार निर्माण होतो आणि वर्तमान जगात आपल्या न्युरॉन्सच्या रचनांनुसार संवेदना जाणवून घेणे हीच यश आणि आनंद याची व्याख्या झाली आहे. या रचनांमध्ये मोडतोड झाली तरच ती व्यक्ती स्वत:मध्ये केंद्रित होते. आपण बाहेरील संवेदनांवर अवलंबून न राहिल्याने आनंद निर्माण होतो आणि श्रीकृष्ण याला ‘आत्मरमण’ असे संबोधतात. 

श्रीमदभगवद्गीताधारित जीवन जगणे म्हणजे या रचना मोडण्यासाठी गीतेने सांगितलेल्या सूचना आणि साधने यांचा वापर करणे आहे, ज्या योगे आपण कोणत्याही निष्कर्षांपासून मुक्त होतो आणि आनंदप्राप्तीला सुरुवात होते. 

 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!