Gita Acharan |Marathi

“सगळे रस्ते रोमकडेच जातात” या उक्तीप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेले सगळे रस्ते हे आपल्या अंतरात्म्याकडेच जातात. यातील काही मार्ग हे विरोधाभासी असल्याचे आपल्याला वाटत राहते. मात्र, हे एक चक्र आहे ज्यानुसार कोणत्याही मार्गावरील प्रवास हा आपल्याला एकाच गंतव्याकडे घेऊन जातो. 

श्रीमदभगवद्गीता ही वेगवेगळ्या पातळीवर कार्य करीत असते. कधीकधी श्रीकृष्ण अर्जुनाच्या पातळीवर येतो तर कधी तो परमात्म्याचे रुप धारण करतो. या दोन्ही पातळ्या भिन्न वाटत असल्याने सुरुवातीला गीतेचा अर्थ लावण्यात आणि समजून घेण्यात अडचणी येतात. 

मागील शतकाच्या प्रारंभी वैज्ञानिकांना प्रकाशाला समजून घेतानाही अशाच अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला हे सिद्ध झाले की प्रकाश हा तरंगाप्रमाणे आहे आणि पुढील काळात समोर आले की त्यामध्ये कणांचेही गुणधर्म आहेत. या दोन्ही बाबी एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे भासते. मात्र, ज्या प्रकाशाला आपण इतके चांगल्या प्रकारे सरावलो आहे तो अंतर्विरोधाने भरलेला आहे. आयुष्याचेही तसेच आहे. 

एकदा एक हत्ती गावात शिरला आणि काही अंध व्यक्तींनी त्या हत्तीला ओळखण्यास किंवा समजून घेण्यास प्रारंभ केला. हत्तीच्या जा भागाला त्यांनी स्पर्श केला, हत्ती अगदी तसाच दिसत असेल अशी ते कल्पना करू लागले. ज्याने सोंडेला स्पर्श केला त्याला वाटले हत्ती हा लांबलचक आणि खडबडीत प्राणी आहे. ज्याने त्याच्या दातांना स्पर्श केला तो म्हणाला हत्ती हा दगडासारखा टणक आहे. दुसर्‍या एकाचा हात हत्तीच्या पोटाला लागला आणि तो म्हणाला हत्ती हा प्रचंड मोठा आणि मऊ आहे. मात्र, त्यांना हत्तीचे पूर्ण रुप काही गवसले नाही. 

एकाच सत्याचे विविधांगी आकलन होणे याच कारणामुळे आपण जगात अनेक भेद असल्याचे बघतो. प्रत्यक्षात, विविध भेद म्हणजे हत्ती नाही तर हे सगळे मिळून हत्ती आकारास येतो. 

आपल्या मनाची स्थितीही या तीन अंधांपेक्षा वेगळी नाही. माणसे, वस्तू आणि नाती यांच्या बाबतीत आपली गत हत्तीचे स्वरुप ओळखण्यासारखीच होते. अपूर्ण आकलनामुळे आपल्या वाट्याला दु:ख येते. 

गीतेचा प्रवास हा अपूर्ण आकलनाकडून पूर्ण समज येण्याचा प्रवास आहे. 80-20 तत्त्वाप्रमाणे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने पुढे टाकलेली काही पावलेदेखील आपल्या जीवनात आनंद निर्माण करू शकतात. 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!