Gita Acharan |Marathi

आपले अंतर्विश्व संतुलित ठेवण्याबद्दल श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते आणि कायदा हा आपण वावरत असलेल्या बाह्य जगाचे नियमन करण्याचे काम करतो. कोणत्याही कर्माचे दोन भाग असतात, पहिला असतो उद्देश आणि दुसरा असतो त्याची कृती. कायद्याच्या भाषेत आणि लॅटिनमध्ये त्यांना अनुक्रमे ‘mens reus’ व ‘actus reus’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ, एक शल्यचिकित्सक आणि एक खुनी हे दोघेही पोटात चाकू खुपसतात. मात्र, शल्यचिकित्सकाचा उद्देश आहे जीव वाचवणे किंवा रुग्णाला बरे करणे तर खुनी माणसाचा उद्देश आहे कुणाचा तरी जीव घेणे किंवा जखमी करणे. या दोन्ही स्थितींमध्ये मृत्यू होऊ शकतो, मात्र त्या मागील उद्देश पूर्णपणे विरुद्ध आहेत. 

कायदा परिस्थितीजन्य आहे तर गीता शाश्वत/ चिरंतन आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवणे एका देशात कायदेशीर आहे आणि दुसर्‍या देशातलो गुन्हा असू शकतो. कायदा परिस्थितींना योग्य किंवा अयोग्य अशी विभागतो, परंतु जीवनात अनेक संशयास्पद परिस्थिती आहेत. 

जोपर्यंत एखादी व्यक्ती कर भरते (actus reus) तोपर्यंत त्यासाठीचे काम ती व्यक्ती आनंदाने करते आहे की दुःखाने करते (Mens reus) याच्याशी कायद्याला काही देणे घेणे नाही. जोपर्यंत ते काम त्या भागातील कायद्याच्या अधीन राहून केली आही तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने काहीही अडचण नसते. एखादा गुन्हा करण्याचा केवळ विचार करणे हे एकवेळ कायद्याला चालू शकते, पण गीतेनुसार असा विचारदेखील मनात यायला नको. 

असे म्हणतात, जेव्हा झाड लहान असते तेव्हाच वाकवून घ्यावे. श्रीमदभगवद्गीता म्हणते, जेव्हा एखादे कर्म अगदी उद्देशाच्याच पातळीवर असते, म्हणजेच वर्तमानात, तेव्हाच त्याकडे जागरुकतेने बघायला हवे आणि जेव्हा ते भविष्यात कृतीच्या पातळीवर येते तेव्हा त्यावर आपले काहीही नियंत्रण नसते. 

कायद्याचे सगळे लक्ष हे कृतीवर असते तर समकालीन नैतिक साहित्य हे आपल्या चांगल्या हेतूंवर भर देते. मात्र, श्रीमदभगवद्गीता आपल्याला चांगल्या हेतूंच्याही पलीकडे विचार करण्यास मदत करते. 

जेव्हा, चांगला किंवा वाईट हेतू, यशाला किंवा अपयशाला भेटलो होतो, तेव्हा एकतर अहंकाराला बळ मिळते किंवा आपल्या आतील निराशा लाव्हायाप्रमाणे उकळू लागते आणि एखाद्या कमकुवत क्षणी फुटून बाहेर येते. या दोन्ही परिस्थितीत आपण आपल्या अंतरात्म्यापासून दूर जात असतो. 

केवळ आपल्या हेतूंकडे डोळसपणे बघून आपण त्याच्या पल्याड जाऊन अंतरात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. 

 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!