Gita Acharan |Marathi

कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. 

अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत. 

हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो. 

कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या संदर्भात अर्जुनासारख्या स्थितीला सामोरे जात असतो. अहंकार समजून घेईपर्यंत आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे संभ्रम कायम राहतात. 

आपल्याला काय कळते आणि आपण काय करतो याबद्दल नव्हे तर आपण कोण आहोत, काय आहोत या संदर्भात श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते. नुसते पुस्तकातील धडे वाचून आपल्याला जशी सायकल चालवता येणार नाही किंवा पोहोता येणार नाही तसेच कितीही तत्त्वज्ञान वाचले तरीही जोपर्यंत आपण आयुष्याकडे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत या तत्त्वज्ञानाचा काहीही लाभ होऊ शकत नाही. गीतेतील मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत - अहंकारमुक्त ‘स्व’पर्यंत-  पोहोचण्यास मदत करू शकतात.

भगवान श्रीकृष्ण ने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तेव्हापासून आजवर काळ प्रचंड प्रमाणात बदलला असे वरवर पाहता सहजच वाटू शकते. मागील काही शतकांमध्ये विज्ञानात झालेल्या प्रगतीने अनेक बदल निश्चितपणे घडवून आणले आहेत. प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या अंगाने विचार केल्यास माणूस या काळात काहीही उत्क्रांत झालेला नाही. आपल्या आतील दुविधेची स्थिती तशीच कायम आहे. बाह्य स्वरुप (झाडे) कदाचित वेगळे भासू शकते, मात्र आपण आतून (मुळे) अजूनही तसेच आहोत. 


Contact Us

Loading
Your message has been sent. Thank you!